Thursday, November 13, 2014

जनतेनेच हाती घेतलेली निवडणूक


जनतेनेच हाती घेतलेली निवडणूक


बारामती मतदारसंघातील एक मतदानकेंद्र. पन्नाशीतील एक नागरिक केंद्राच्या आवारात जरा सैरभैरपणे फिरत होते. त्यांना नरेंद्र मोदींचा कोणता ‘माणूस’ बारामतीतून उभा आहे, याची माहिती हवी होती...
 
बेळगावातील एक शंभरीतील एक जख्खड म्हातारी थेट मतदान अधिकाऱ्यांकडे गेली आणि म्हणाली, ‘मला दिसत नाही. मोदींवर शिक्का मारायचा. जरा मदत करा...’
 
पिंपरीतील कॉलेजातील एक विद्यार्थी. मूळचा गोंदियाचा. नवमतदार. कोणत्याही स्थितीत मतदान करण्यासाठी तो थेट दोन दिवस वाया घालवून, खिशाला चाट लावून गावी गेला. त्याचा निर्णय पक्का होता : आयुष्यातले पहिले मत मोदींनाच!
 
खूप छोटी छोटी उदाहरणे... पण म्हणतात ना, छोट्या छोट्या थेंबातूनच सागर बनतो. देशात जी मोदी नावाची ‘त्सुनामी’ घोंघावत आली आहे, ती अशाच छोट्या-मोठ्या थेंबांतून रोरावत आली आहे. त्यामुळे स्वतःला ‘पोल पंडित’ म्हणविणारे उद्‍ध्वस्त तर झालेच; पण खुद्द भाजपमधील अनेकांना एवढा भव्यदिव्य, सुस्पष्ट जनादेश अचंबित करणारा होता. जातीपातींमध्ये गुरफटलेल्या उत्तर प्रदेशात ८० पैकी ७३ जागा भाजपला मिळू शकतात, यावर तर अनेकांचा विश्वासच बसत नव्हता. पण आश्चर्याचा धक्का एवढ्यापुरताच मर्यादित नव्हता.
 
निकालापूर्वीच्या बातम्या, वार्तांकने, वृत्तवाहिन्यांवरील चर्चा, बुद्धिजीवांमधील चर्चा आपण सर्वांनी ऐकली असेलच. मोदी पंतप्रधान होतील, असे अनेकांना वाटायचे; पण भाजपला स्वबळावर बहुमत मिळेल, असे कोणालाही वाटत नव्हते. ज्यांना वाटायचे, त्यांना ‘डेंजरस ऑप्टिमिस्ट’ म्हटले जायचे. पण यात वावगे असे काहीच नव्हते. कारण तीनदा सत्ता मिळवूनही (१९९६, ९८ आणि ९९) भाजप खऱ्या अर्थाने आजपर्यंत ‘राष्ट्रीय पक्ष’ कधीच बनला नव्हता. देशातील पंधराहून अधिक राज्यांमध्ये, लोकसभेच्या दोनशेहून अधिक जागांवर त्याचे अस्तित्व औषधांपुरतेही नव्हते आणि नाहीही. पण यंदा मोदी त्सुनामीत ही सारी वस्तुस्थिती वाहून गेली. उत्तर भारत, मध्य, पश्चिम भारत तर पादाक्रांत केलाच; पण त्याचबरोबर आतापर्यंत अस्पर्श असलेल्या दक्षिण, पूर्व आणि ईशान्य भारतातही आपला ठसा उमटविला. किंबहुना प. बंगाल, ओडिशा, तमिळनाडू, केरळ, सीमांध्र आणि तेलंगण आदी राज्यांमध्ये भाजप आता दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनू पाहत आहे. राज्ये आपलीच मांडलिक आहेत, अशा भ्रमात वावरणाऱ्या प्रादेशिक नेत्यांना हा एक इशाराच आहे.
 
(१८ मे २०१४ रोजीचे ‘मटा’मधील पान)
अतिशयोक्तीचा धोका स्वीकारूनही मोदींचा विजय ही एकप्रकारची क्रांतीच आहे, असे म्हणण्याचा मोह होतो आहे. कारण तिने मतपेटीतून जन्म घेताना सर्व गृहीतकांना उद्‍ध्वस्त केले आहे. त्यातील पहिले आणि मुख्य गृहीतक होते, ते या बहुरंगी, बहुसांस्कृतिक देशांत भाजपसारख्या उजव्या विचारसरणीच्या ‘एक्सक्लुझिव्ह’ पक्षाला स्वबळावर कधीच सत्ता मिळू शकणार नाही. दुसरे म्हणजे, हे फक्त काँग्रेसविरुद्धच्या ‘अँटी इन्मकबन्सी’मुळे घडले आहे. हे ही गृहीतक अर्धसत्य आहे. गेल्या काही वर्षांतील कारभारामुळे काँग्रेसविरुद्धचा राग तीव्रच होता आणि मतदार तो व्यक्त करतीलच, याची पुरेशी जाणीव काँग्रेस नेत्यांनाही होती; पण ती एवढी टोकदार आणि कठोर असेल, याची साधी कल्पनाही आली नाही. पण केवळ एवढ्यामुळेच ‘त्सुनामी’ नाही उसळली. ती उसळली जशी रागातून, तशी टोकाच्या अपेक्षेतूनही! मतदारांना मोदी नुसतेच मळलेले पर्याय वाटले नाहीत, तर त्यांच्यामध्ये अपेक्षा दिसल्या. विश्वासाने भारलेल्या मोदींच्या बॉडी लँग्वेजमधून त्या चेतविल्या गेल्या. ‘अच्छे दिन आने वाले है...’ ही जाहिरात तर त्याच अपेक्षांना अधोरेखित करीत होते. ही जाहिरात इन्स्टंट हिट होण्यामागेसुद्धा याच अपेक्षांचे प्रतिबिंब होते. गुजरातमधील खऱ्या, खोट्या विकासाची चर्चा राजकीय नेते, विचारवंत आणि अभ्यासक करतच राहतील; पण सामान्यांना त्यांना काडीचाही रस वाटला नसावा. रोखठोक बोलणारा, देशाला महाशक्ती बनविण्याची बघितलेली स्वप्ने प्रत्यक्षात उतरविण्याची धमक असलेला, भले-बुरे असे काहीही असले, तरी स्वतःचे असे एक विकासाचे मॉडेल तयार करणारा नेता त्यांना भावला आणि त्यातूनच मोदींबाबत टोकाच्या अपेक्षाही निर्माण झाल्या.
 
याच अपेक्षा मतपेटीत उतरल्या. भाजपच्या निवडून आलेल्या डोक्यांबरोबरच, भाजप- एनडीए उमेदवारांना मिळालेले मताधिक्य पाहा. सोलापूर. खुद्द सुशीलकुमार शिंदे पडतील, यावर कुणीच विश्वास ठेवला नसता. ते पडले. असे लोकशाहीत शक्य आहे; पण किती मतांनी पडावे? तेही शरद बनसोडे यासारख्या आयात केलेल्या भाजपच्या उमेदवाराकडून? तब्बल दीड लाख मतांनी! सांगली. वसंतदादा पाटील यांचा जिल्हा. तिथेही त्यांचे वारसदार, केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील पडले. किती मतांनी? सुमारे अडीच लाख मतांनी. लातूर. कै. विलासराव देशमुखांचा गड. त्यांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेस हरली. किती मतांनी? तब्बल अडीच लाख मतांनी! नंदुरबार. काँग्रेसचा अत्यंत सुरक्षित मतदारसंघ. माणिकराव गावित सलग नऊ वेळा सहजपणे निवडून आले आहेत. तेही यंदा पडले. किती मतांनी? सुमारे एक लाख मतांनी. नारायण राणे हे कोकणातील सर्व अर्थाने ‘स्ट्राँगमन’. त्यांचेही चिरंजीव डॉ. नीलेश आपटले. किती मतांनी? तब्बल दीड लाख मतांनी. लोकशाहीत हार-जित होतच असते. पण मतांची धक्कादायक पिछाडी पाहिल्यास विश्वासच बसणार नाही.
 
हे चित्र महाराष्ट्रापुरतेच नाही. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील भाजपचे बहुतांश उमेदवार सरासरी दोन लाखांनी निवडून आले आहेत. माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह तर पाच लाख सत्तर हजार मतांनी विजयी झाले आहेत. याच गाझियाबादमधून पराभवाच्या भीतीने राजनाथसिंह लखनौला ‘पळून’ गेले, असे अनेक जण सांगत होते. सुदूरच्या कन्याकुमारीत (तमिळनाडू) भाजपचा उमेदवार सुमारे दीड लाखांनी विजयी झाला आहे. बंगालमध्ये दोनच जागा मिळाल्या; पण मते सतरा टक्क्यांहून अधिक मिळाली. यापूर्वी भाजपला तिथे पाच-सहा टक्क्यांपेक्षाही कधीही जास्त मते मिळाली नव्हती. 
 
केवळ काँग्रेसविरोधातील जनक्षोभातून हे घडलेले नाही. तसे आणीबाणीच्या वेळी घडले होते. काँग्रेसच्या विरोधातील उमेदवार, एवढ्याच निकषांवर नानाविध पक्षांची माणसे संसदेत पोचली होती. आताही तसेच घडले आहे; पण ‘मोदींचा माणूस’ याच निकषांवर. मतदारांनी भाजपपेक्षा मोदी या नावाला प्राधान्य दिल्याचे दिसते. कारण एकच मोदी काही तरी करतील, हा अतीव विश्वास! या विश्वासापोटी, अपेक्षांपोटी जनतेनेच ही निवडणूक हाती घेतली होती. जात, धर्म, पाडापाडी, पक्षांतर्गत काटाकाटी, स्थानिक समस्या, पैसा, गुंडगिरी हे नेहमीचे मुद्दे यंदाही होतेच; पण जनतेने त्याच्यापलीकडे जाऊन मोदींना भरभरून कौल दिला आहे. स्थिर सरकार देण्याचे आपले कर्तव्य बजावलेले आहे. एवढे भाग्य मोदींपेक्षा कैकपटीने लोकप्रिय, स्वीकारार्ह आणि आदराला पात्र असलेल्या अटलबिहारी वाजपेयींनाही मिळालेले नव्हते, यावरूनच मोदींकडून असलेल्या अपेक्षांची सार्थ कल्पना येईल.
 
सामान्यातील सामान्यांच्या प्रचंड मोठ्या अपेक्षांचे ओझे घेऊन येणारे मोदी कदाचित पहिलेच पंतप्रधान असतील. जनतेच्या आणि मोदींच्या सुदैवाने त्यांना सुस्पष्ट बहुमत आहे. म्हटले तर अगदी एनडीएतील मित्रपक्षांचीही गरज नाही. एवढेच नव्हे, तर ‘काँग्रेसमुक्त भारत’ ही आग्रही मागणीही जनतेने कोणतेही आढेवेढे न घेता मान्य केली आहे. त्यामुळे आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता आहे, पाठिंबा देणारी मंडळी कामच करू देत नाहीत, ते सतत ब्लॅकमेलिंग करत राहतात, अशी लंगडी सबब मोदींना देता येणार नाही. पक्षांतर्गत विरोधकांनाही त्यांनी जागेवर ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्या उपद्रवाकडेही बोट दाखविता येणार नाही. विरोधी पक्ष कामांत अडथळे आणत असल्याच्या आडही त्यांना लपता येणार नाही. मोदींना जसे हवे होते, तसे स्थिर सरकार जनतेने देऊ केले आहे. त्यामुळे मोदींसमोर आता दोनच पर्याय आहेत : परफॉर्म ऑर पेरिश! म्हणजे आपल्या मराठीत असे म्हणता येईल, की बाप दाखव नाही, तर श्राद्ध कर! 
 
जनादेशाच्या अर्थामध्ये अमाप अपेक्षा दडलेल्या आहेत, हे उघडच आहे. कोट्यवधींच्या अपेक्षांना पुरे पडण्याचे जसे आव्हान आहे, तशी ऐतिहासिक संधीही दडली आहे. अपेक्षाभंगासाठी जनतेने त्यांच्या झोळीत मतांचे दान टाकलेले नाही. ज्या अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर जनक्षोभाच्या उठावाला प्रारंभ झाला, त्याच लोकपाल आंदोलनासारखा अपेक्षाभंग सोसण्याची जनतेची तयारी नाही. जनतेच्या अपेक्षाही साध्या-सोप्या आणि मूलभूत आहेत. त्यांना रस्ते हवेत, पाणी हवे आहे, चोवीस तास वीज हवी आहे, प्रगतीची संधी देणारे शिक्षण हवे आहे, रोजीरोटीसाठी रोजगार हवा आहे. हे सारे होण्यासाठी भक्कम अर्थव्यवस्था हवी आहे. विकासासाठी ५६ इंचाची छाती लागते, हे प्रचारसभेत सांगणे ठीक आहे; पण प्रत्यक्षात विकासासाठी ५६ इंच छातीची नव्हे, तर दूरदृष्टी, प्रभावी अंमलबजावणी आणि सर्वांना सामावून घेणाऱ्या विशाल हृदयाची गरज आहे.
 
अपेक्षाभंग केला, तर तुमचा ‘केजरीवाल’ होईल, या इशाऱ्यासह मोदी यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
 
(‘मटा, पुणे’, प्रसिद्ध दिनांक १८ मे २०१४)

No comments:

Post a Comment