Monday, March 8, 2010

अरब जगतात "भारतमैत्री'चा सूर

महाकाय भारताच्या तुलनेत पाकिस्तानचा जीव इवलासाच! चारही युद्धांत भारतासमोर सपशेल हार पत्करावी लागली; तरीही त्यांची खुमखुमी मोठी. भारताचे नाक कापण्याचे नापाक इरादे त्यांनी कधीही सोडले नाहीत. हे सगळे कोणाच्या बळावर? काही मित्रदेश आणि "शत्रूचा शत्रू' या धोरणाने पाकिस्तानला हवी ती मदत पुरविणाऱ्या संधिसाधू देशांमुळे. सौदी अरेबिया हा पहिल्या गटात मोडणारा देश. तो काही भारताचा थेट शत्रू कधीच नव्हता. याउलट शेकडो वर्षांपासून सौदीतील अरब मंडळी भारतात व्यापारउदिमासाठी येत असत. तरीही एक मुस्लिम बहुसंख्य देश म्हणून सौदीने पाकला हरतऱ्हेने मदत केली. झिया उल हक यांच्या "इस्लामीकरण' धोरणाला सौदीचाच पाठिंबा होता. काश्‍मीर मुद्‌द्‌यावर सातत्याने पाठराखण करताना भारतविरोधी युद्धात सर्वोपतरी साह्य करणारा सौदीच होता. 1998 मध्ये अणुस्फोटानंतर पाकवर आर्थिक निर्बंध घालण्यात आले, तेव्हा दररोज पन्नास हजार बॅरल कच्चे तेल मोफत देणाराही सौदीच होता. पाकशी एवढी घट्ट मैत्री असणाऱ्या सौदीतील राजघराण्याने नुकतेच जेव्हा पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे रियाधमध्ये जे अक्षरशः शाही स्वागत केले, त्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सगळे मंत्रिमंडळ आणि राजकुमार सुलतानसह राजघराणे उपस्थित होते. प्रचंड जागतिक वलय असणारे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पहिल्यावहिल्या भेटीमध्येही एवढे जंगी स्वागत झाले नव्हते.
कशामुळे झाले हे सौदीचे मतपरिवर्तन? अरब- मुस्लिम जगतात या प्रश्‍नांचे पडसाद उमटलेले दिसतात. अरब जगतातील बहुतेक वर्तमानपत्रांनी हाच मुद्दा चर्चिला आहे. खलिज टाइम्सच्या संपादकीय लेखात म्हटले आहे, ""इस्लामचे घर असलेला सौदी अरेबिया आणि जगातील दोन क्रमांकांची मुस्लिम लोकसंख्या असलेला भारत यांच्यामधील संबंध सौदी- पाक यांच्यातील घनिष्ठ नात्यांनी झाकोळले गेले होते. ही चूकच होती. याचा अर्थ असा नव्हे, की सौदी-भारत संबंधांसाठी सौदी-पाक संबंधांवर पाणी ओतले पाहिजे. दोन्ही गोष्टी परस्परांपासून वेगळ्या करण्याची गरज होती. ही वस्तुस्थिती दोन्ही देशप्रमुखांनी लक्षात घेतलेली दिसते आहे. त्यातूनच राजे अब्दुल्ला बिन अब्दुल अझीझ यांची 2006 मधील भारतभेट आणि डॉ. सिंग यांचे आताचे स्वागत हे घडलेले दिसते आहे. हे छोटेसे पाऊल आणखी समृद्ध केले पाहिजे. पाकबाबतच्या संबंधांवरून भारताच्या मनातील संशय दूर केले पाहिजेत.''
याच अग्रलेखात, "ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज'मध्ये(ओआयसी) भारताला प्रवेश दिला पाहिजे, अशी सूचना आहे. "ओआयसी'ने काश्‍मीर मुद्द्यावर आतापर्यंत नेहमीच पाकची पाठराखण केली; किंबहुना यामुळेच भारताला "निरीक्षक' म्हणून समावेश करण्यास सातत्याने नकार दिला आहे. ""जर मुस्लिम लोकसंख्या आहे, म्हणून फिलिपिन्स आणि थायलंड यांना प्रवेश दिला जातो, तर जगातील दुसऱ्या क्रमांकाची मुस्लिम लोकसंख्या असलेल्या भारताला प्रवेश का नाकारला जातो?,'' असा थेट सवाल अग्रलेखात विचारला आहे. एवढेच नव्हे, तर सौदी-भारत मैत्रीचे भविष्य या प्रश्‍नावर नक्कीच आधारलेले असेल, असेही बजावले आहे.
"अरब न्यूज डॉट कॉम'ने भारत ही उगवती महासत्ता आहे, याकडे लक्ष वेधून भारताशी फटकून राहण्यामध्ये सौदीचे हित नाही, असे बजावले आहे. "भारतात परतताना डॉ. सिंग यांच्या मनात सौदीबद्दल कोणताही किंतू, संशय अथवा गैरसमज राहणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. तसे घडले तर द्विपक्षीय सहकार्याच्या प्रचंड संधी आहेत...'' ही बोलकी टिप्पणी आहे. त्याच्याशी कुणीही सहमत होईल...

No comments:

Post a Comment