Wednesday, December 31, 2014

यत्र, तत्र, सर्वत्र…



मोदी, मोदी, मोदी

यत्र, तत्र, सर्वत्र…

 

‘मोदीजी को लाने वाले हैं, अच्छे दिन आने वाले हैं…’ ही एक निवडणुकीतील फक्त जाहिरात नव्हती. त्यात सर्वसामान्य भारतीयांच्या आशा दडल्या होत्या. एवढ्या अभूतपूर्व अपेक्षांचे ओझे नरेंद्र मोदी यांच्यापूर्वीच्या कोणत्याही पंतप्रधानांवर नसावे. २०१४वर्ष हे मोदींना मतांचे दान भरभरून देण्याचे असेल तर २०१५ हे नवे वर्ष त्याची किंचितशी तरी परतफेड करण्याचे असावे… 



0 जानेवारी २०१४मधील शेवटचा आठवडा असावा. राष्ट्रीय स्तरावर संघटनेचे काम करणारे भाजपचे एक नेते भेटले होते. चर्चेचा मुद्दा होता, स्वाभाविकपणे येणारी लोकसभा आणि नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्याचे फायदे आणि तोटे. त्यांनी एक किस्सा सांगितला. त्यांना हरियाणातील एक कार्यकर्ता भेटला. त्यांनी त्याला मोदींमुळे काय होईल, असा प्रश्न विचारला. तो कार्यकर्ता म्हणाला, ‘मोदीजी है, तो पत्थर, किंकर भी चुनके आयेगें...’

0 डिसेंबर २०१४मधील शेवटचा आठवडा. एका कार्यशाळेच्या निमित्ताने भाजपचे एक ज्येष्ठ नेते भेटले. पक्षाच्या परराष्ट्र धोरणाचे ते धुरीण. अनौपचारिक गप्पांच्या ओघात त्यांना म्हटले, ‘सध्याचे आपले परराष्ट्र धोरण फक्त ‘वन मॅन शो’ वाटत नाही का? परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे अस्तित्वही जाणवत नाही, असे कसे काय?’ हाच प्रश्न त्यांना औपचारिक चर्चेतही विचारला होता. तेव्हा त्यांनी ‘नो कमेंट्स’ सांगून बगल दिली होती. अनौपचारिक चर्चेत मात्र ते डोळे मिचकावत म्हणाले, ‘फक्त सुषमाच कशाला? अन्य कोणताही एक तरी मंत्री तुम्हाला दिसतो का? जाणवतो का?...’ 

...दोन्ही उदाहरणातील शेवटची विधाने खूप आशयपूर्ण आहेत. मावळत्या वर्षातील राजकीय घडामोडींचे सारे सार त्यात आले आहे, असे म्हणता येईल. सामान्य जनतेच्या अभूतपूर्व अपेक्षांतून जन्माला आलेले ‘मोदी सरकार’ ते सत्तेची सारी सूत्रे स्वतःच्या हातात ठेवण्यात यशस्वी झालेले नरेंद्र मोदी... हे वर्तुळ सरत्या वर्षात पूर्ण झाले आहे. भाजपच्या मानसपिता असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जितका ‘एकचालकानुवर्ती’ असल्याचे मानले जाते; पण हे सरकार त्याहीपेक्षा अधिक स्वयंकेंद्रित आहे. मोदींचे गुजरातमधील राजवट माहिती असणाऱ्यांसाठी यात काहीच नवल नाही; पण दिल्लीकरांसाठी, देशासाठी तसे नवे आहे. इंदिरा गांधी यांच्यानंतर एवढी केंद्रित सत्ता असलेला पंतप्रधान देशाने पाहिलेला नाही.

सरत्या वर्षाचा उदयच मुळात मोदींच्या जयजयकाराने सुरू झाला होता. सोशल मीडियात तर अक्षरश: उन्माद होता. तोच हळूहळू सामान्य जनतेपर्यंतही झिरपला होता. गावांगावातील पारांपासून ते मध्यमवर्गीयांच्या दिवाणखान्यांपर्यंत मोदी नावाचा ‘मसीहा’ येतो आहे, असे वातावरण होते. त्याच्या जोडीला भन्नाट, कल्पक जाहिराततंत्र. सुरुवातीला वाटत होते, की काँग्रेसविरोधातील अतीव संताप मतपेटीतून प्रगटेल. पण मतदानाच्या दिवशी तर जणू काय ‘आशेचा जल्लोष’ (‘सेलिब्रेशन ऑफ होप्स’) ठिकठिकाणच्या मतदानकेंद्रावर ठळकपणे दिसत होता. एरव्ही गुप्त मतदान करणारेही उघडउघडपणे ‘मोदींचे कमळ कुठे आहे?’ असे धडधडीत सांगत होते. हे सारे निकालांतून प्रतिबिंबित झाले. संघ परिवाराच्या अनेक पिढ्यांना खस्ता खावूनही जे जमले नाही, देशभर मोहिनी असलेल्या अटलबिहारी वाजपेयींनाही जे जमले नाही, ते मोदींनी करून दाखविले होते. केंद्रात सत्ता, ती ही स्वबळावर. कोणाच्या कुबड्यांची गरज नसलेले सरकार. देशाला ‘काँग्रेसमुक्त’ करू, असे मोदी सांगत होते; पण त्यावर कोणीही विश्वास ठेवला नव्हता. पण प्रत्यक्षात तसेच घडले होते. काँग्रेस फक्त ४४. काँग्रेसवर अनेक संकटे कोसळली; पण एवढी नामुष्की कधी ओढवली नव्हती. एके काळचे सर्वशक्तिमान राहुल गांधी तर चेष्टेचा विषय झाले. या जबरदस्त दणक्यातून काँग्रेस अद्यापही सावरल्याचे चित्र दिसत नाही. 

सरत्या वर्षाचा विचार करता, तीन निष्कर्ष ठळकपणे नोंदविता येतील. 

ध्रुव बदलला : दोन-पाच वर्षांचा अपवाद वगळता आजवर काँग्रेस नेहमीच ‘पोल पोझिशन’ला राहिली आहे. राजकारणातील तिचे स्थान अढळ... ध्रुव बाळासारखे! थोडक्यात काँग्रेसविरोधात सर्व, असाच सामना नेहमीच असायचा आणि तो ही काँग्रेसच जिंकायची. १९८९नंतर हे चित्र हळूहळू बदलत गेले. सोनिया गांधी काँग्रेसमध्ये आल्या तरी वाजपेयी सरकारला दुसरी टर्म मिळणार, असे मानले जात असतानाही २००४मध्ये अनपेक्षितरीत्या काँग्रेसची यूपीए सत्तेवर आली आणि तिने दहा वर्षे देशावर राज्यही केले. अशा काँग्रेसला बाजूला सारून भाजप आता नुसता देशाचा राज्यकर्ता झाला नाही, तर राजकारणाचा मुख्य ध्रुव झाला आहे. भाजपविरुद्ध सर्व, मोदीविरुद्ध सर्व... असे चित्र आहे. आतापर्यंत काँग्रेसला रोखण्यासाठी सर्व जण एकत्र येण्याची भाषा करीत. आता भाजपला रोखण्यासाठी एकत्र येण्याची भाषा ऐकू येऊ लागली आहे. मोदींचा धसकाच एवढा आहे, की आतापर्यंत एकमेकांचे तोंडही न पाहणारे मुलायमसिंह, लालूप्रसाद यादव, नितीशकुमार यांना ‘जनता परिवारा’चे बाळंतपण करावे लागत आहे. अशाच प्रकारचे भाजपविरोधी ध्रुवीकरण सर्वच पातळ्यांवर सुरू झालेले दिसते. 

काँग्रेसमुक्तीच्या दिशेने... : वारसा, कार्यकर्त्यांचे जाळे, जाती-धर्मांची पक्की गणिते, नेहरू-गांधी घराणे आदी एक्के बाळगून असलेल्या काँग्रेसला मुळापासून उचकटून टाकण्याची मोदींची वल्गना (हो हो वल्गनाच...) अनेकांना त्यांच्यातील उद्दामपणाचे प्रतीक वाटत होती; मात्र, सोळाव्या लोकसभेमध्ये अगदी तसेच हुबेहूब घडले. काँग्रेसचा एवढा पालापाचोळा झाला, की अगदी विरोधी पक्षनेतेपद मिळविण्याची लायकी ती गमावून बसली. अन्य विरोधी पक्ष तर काँग्रेसच्या वाऱ्यालाही फिरण्याचे टाळत आहे. नेते दिशाहिन आणि कार्यकर्ते हताश आहेत. भाजपचा अश्वमेध नुसता लोकसभेपुरताच धावला नाही, तर तो राज्यांराज्यांमध्येही घुमतो आहे. शिवसेनेबरोबर युती तोडण्याचा मोठा धोका स्वीकारूनही महाराष्ट्रात ‘बिग ब्रदर’ होण्याची कामगिरी, हरियाणात तर दहापट जागा मिळवून सत्ता, झारखंडमध्ये प्रथमच बहुमत मिळविण्याची कामगिरी आणि जम्मू काश्मीरमध्ये तर जबरदस्त कामगिरी. दुप्पट जागा आणि सर्वाधिक मते. ही सर्व राज्ये काँग्रेसकडून हिसकावून घेतली आहे. आता काँग्रेसकडे फक्त कर्नाटक, केरळ आणि आसाम हीच तीन प्रमुख राज्ये राहिली आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, तमिळनाडू, आंध्र, प. बंगाल आदी राज्यांमध्ये काँग्रेसची स्थिती अगदीच नाजूक आहे. अशा स्थितीत मोदींची सावली असलेल्या अमित शहा यांच्या टोळधाडीच्या मदतीने ‘काँग्रेसमुक्त भारता’च्या दिशेने भाजपची दमदार वाटचाल चालू आहे. 

एकपक्षीय राजवट : १९८९नंतर आघाड्यांचे राजकारण सुरू झाले. तेव्हा तर व्ही. पी. सिंहांचे सरकार डावे आणि उजव्यांचे म्हणजे भाजपच्या पाठिंब्यावर तरले होते. पुढे वाजपेयींनी तर २६-२७ पक्षांचे सरकार इतक्या कौशल्याने चालविले, की त्याची मोहिनी (आघाडी करणारच नाही, अशी भूमिका घेणाऱ्या) काँग्रेसलाही पडली. त्याचमुळे तसाच प्रयोग काँग्रेसने दहा वर्षे चालविला. आघाडीचे सरकार असले की शासनकला बासनात गुंडाळून राजकीय तडजोडी करणे ओघाने आलेच. सुमारे पंचवीस वर्षांनंतर स्वबळावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारला मात्र ती अपरिहार्यता नाही. मोदींनी ठोकलेली मांड पाहिली तर यापुढील काही वर्षे एकपक्षीय राजवटीची असतील, हे नक्की. 

२०१४ हे वर्ष ‘मोदी वर्ष’ म्हणून मानले जाईल. ‘यत्र तत्र सर्वत्र’, असे म्हणावे एवढे मोदी सगळीकडे आहेत. कधी कधी त्यांचे ‘ओव्हर एक्स्पोजर’ नको नको वाटणारे आहे. त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी असला, तरी मोठ्या अपेक्षा असलेल्या जनतेकडील संयम तेवढा नाही. मोदींकडून चमत्काराची अपेक्षा नाही; पण काही तरी बदल होतो आहे, याची जनतेला खात्री हवी आहे. म्हणून तर तिने आपले दान मोदींच्या पदरात भरभरून घातले आहे. स्वतःच वाढविलेल्या अपेक्षांचे मोठे ओझे मोदींच्या मानगुटीवर आहे. मोदींसारखा बेरकी, मुरब्बी राजकारणी, कुशल प्रशासक, कल्पक नेता आणि स्वयंकेंद्रित ‘प्रधानसेवक’ या साऱ्या अपेक्षांचे ओझे कसे वाहील?

...आशा करू या, की नव्या वर्षात त्याची चुणूक नक्की दिसेल. 
( २८ डिसेंबर २०१४रोजी ‘मटा-पुणे’मध्ये प्रसिद्ध)

No comments:

Post a Comment