Profile of Shyam Saran, a outgoing special envoy of PM on climate change...
"पंतप्रधानांचे तापमानबदल विषयक विशेष दूत श्याम सरन यांना 14 मार्च रोजी पदभार सोडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे...''
पंतप्रधान कार्यालयाचे हे एका ओळीतील ठोस निवेदन सोपे-सुटसुटीत वाटेल; पण त्यामागे मोठी गुंतागुंत आणि एकूणच भारताच्या तापमानबदल विषयक धोरणातील धरसोडपणा दडलेला आहे. 2004 पासून पहिल्यांदा परराष्ट्र सचिव, नंतर अणुकरारासाठी पंतप्रधानांचे विशेष दूत आणि त्याहीनंतर तापमानबदल विषयक विशेष दूत, अशा बड्या जबाबदाऱ्या सांभाळणारे सरन हे पंतप्रधान कार्यालयातील महत्त्वाचा कोपरा होते. कोपनहेगन येथे झालेल्या जागतिक तापमान बदल परिषदेदरम्यान आणि नंतर ज्या दोन प्रमुख घडामोडी घडल्या, त्याने सरन दुखावले गेले, नाराज झाले होते. जागतिक तापमानबदलाच्या चर्चेची सूत्रे हाती घेताना केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी भारताच्या पारंपरिक भूमिकेला छेद घेणारी पावले टाकण्यास सुरवात केली. कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण मोजताना दरडोई उत्सर्जन (पर कॅपिटा इमिशन) हाच निकष पाहिजे, अशी ठाम भूमिका आतापर्यंतच्या सरकारांनी घेतली होती. सरन हे त्याच भूमिकेला चिकटून होते. ते एकीकडे कोपनहेगन परिषदेत बड्या देशांशी घासाघीस करत असताना, रमेश यांनी भारत स्वयंस्फूर्तीने उत्सर्जनाचे बंधन लादून घेईल, अशी घोषणा लोकसभेत केली. विशेष म्हणजे ही घोषणा त्यांनी सरन यांना विश्वासात न घेताच केली होती. विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या आशीर्वादानेच रमेश यांनी ही घोषणा केल्याचे समजल्यानंतर ते स्वाभाविकपणे दुखावले गेले. दुसरीही घडामोड त्यांचा हिरमोड करणारी ठरली. परराष्ट्र सेवेतील त्यांचे कनिष्ठ सहकारी शिवशंकर मेनन यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती झाल्याने त्यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा मिळाला. असाच दर्जा देऊ, असे पंतप्रधानांनी त्यांना सांगितले; पण तशी फाइल काही पुढे सरकली नाही. त्याची परिणती ते "पीएमओ'त बाहेर पडण्यात झाली. याचा अर्थ असा नव्हे, की हा अनुभवी मुत्सद्दी पदांना चिकटून राहण्यात धन्यता मानणारा होता. वास्तविक पाहता त्यांनी आपल्या पदाचा दोनदा राजीनामा देऊ केला होता. पहिल्यांदा अणुकराराला अमेरिकी कॉंग्रेसची अंतिम मान्यता मिळाल्यानंतर आणि दुसऱ्यांदा डॉ. सिंग यांचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर; पण पंतप्रधानांनीच त्यांना थांबविले होते. 1970 च्या तुकडीच्या या अधिकाऱ्याने नेपाळ, इंडोनेशिया, म्यानमार येथे राजदूत म्हणून, तर मॉरिशस येथे उच्चायुक्त म्हणून काम केले आहे. एच.डी. देवेगौडांच्या कार्यालयातील काही ढुढ्ढाचार्यांनी खोडा घातला नसता, तर जपानमधील भारतीय दूतावासाचे सर्वाधिक तरुण प्रमुख बनले असते. बीजिंग येथील दूतावासात असताना त्यांनी पाठविलेल्या अहवालामुळे त्यांच्यात भावी परराष्ट्र सचिव दडलेला असल्याची जाणीव अनेकांना झालेली होती. अणुकरार मार्गी लावणे सोपे नव्हते. मनात अनेक शंका असणाऱ्या संरक्षण संशोधकांना राजी करणे, भारताचे सामरिक हित जपण्यासाठी अमेरिकेशी वाटाघाटी करणे आणि जगभर प्रवास करून भारताचा "न्यूक्लिअर क्लब'मधील प्रवेश सुरळीत आणि सुखरूप करताना त्यांच्यातील मुत्सद्द्याची कसोटी होती; पण ते आव्हान त्यांनी यशस्वीरीत्या पेलले.अत्यंत प्रोफेशनल, प्रामाणिक, कामसू असणाऱ्या सरन यांची खरी ओळख "टफ निगोशिएटर' अशीच आहे. ते जीनिव्हाला असताना निःशस्त्रीकरणाची जबाबदारी त्यांच्यावर होती, तेव्हा जगातील बड्या देशांच्या "हाय प्रोफाइल' अधिकाऱ्यांशी "डिलिंग' करण्याचा अनुभव त्यांनी मिळविला होता. धारदार चर्चेचे कौशल्य त्याचवेळी विकसित झाले होते, असे त्यांचे सहकारी मित्र सांगतात. तरुण अधिकारी ते विशेष दूत या प्रवासात त्यांची एक गोष्ट कायम राहिली, ती म्हणजे त्यांनी लिहिलेली भाषणे. प्रत्येक शब्दाची रचना अत्यंत काळजीपूर्वक, हे त्यांचे वैशिष्ट्य. रात्र-रात्रभर जागून भाषणांना अंतिम स्वरूप देणारे सरन अनेकांनी पाहिलेले आहेत. त्यांच्या या "एक्झिट'मुळे एक जबरदस्त कारकीर्द मावळतीला गेली आहे.
No comments:
Post a Comment